गर्भगिरी पर्वत रांगेतील उंच डोंगर पायथ्याशी असलेल्या मोहटा गावचे सत्पुरुष श्री रेणुका मातेचे परमभक्त श्री बन्सीबाबा दहिफळे हा दंडकारण्याचा प्रदेश येथे पूर्वी मोहाची खूप झोडे होती म्हणुन गावांस मोहटा गाव असे म्हणतात. गडाच्या दहाहि दिशांस पुण्यपावन, पवित्र व महामुनिंनी साधुसंताच्या तप:श्चर्येने पूनीत झालेली, पुरातन इतिहास असलेली पवित्र क्षेत्रे आहेत. अशा पवित्र पुण्यपावन पुण्यक्षेत्रामध्ये भक्त कल्याणार्थ मोहटा ग्राम नावाने श्री मोहटादेवी अवतीर्ण होऊन प्रसिध्द झाली. पूर्वीच्या काळी परिसरातील गावोगावचे अनेक भक्तांना संघटित करुन बाबा श्री क्षेत्र माहुरगडाची वारी करायचे. सर्व संसार, गायीगुरे बरोबर असायची. पायी चालावे, मुखाने जय जगदंब, जय जगदंब असे नामस्मरण, देवी चरित्राचे गुणगान, साधुसंताची चरित्र गाण शचिर्भूत होऊन नित्य उपासनाकर्म करावे, सदाचरणाने पायी चालावे व मुक्कामी स्थळी कीर्तन भजन करावे अशा दिनचर्येने माहुरगडी पोहचल्यावर मातृतीर्थचे स्नान करुन तीर्थजलाने श्री रेणुकामातेची पूजा, अभिषेक, साडी ओटी व महानैवेद्य पुरणपोळीचा अपर्ण करावा. श्री सप्तशतीपाठ, होमहवण, चंडीयांगाचे आचरण करावे अशी सारी सेवा करुन परत मोहटागांवी यावे. त्यांना जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा, त्यांच्या आचरणातुन प्रामाणिकपणे प्रपंच हाच जणू परमार्थ ही शिकवण समाजास मिळायची.